लोकसत्ता वार्ताहर

बारामती : ‘बारामतीमधील विधानसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा आठवडाभरात करण्यात येईल. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार उमेदवाराचे नाव जाहीर करतील,’ अशी माहिती राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते आणि बारामतीचे संभाव्य उमेदवार युगेंद्र पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ‘बारामती’चे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने होत आहे. बारामतीमधील निवडणूक विशेष असल्याने पक्षाचा उमेदवार कोण असेल, याची घोषणा शरद पवारच करतील, असे या पक्षाच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा आठवडाभरात होईल, असे स्पष्ट केले. ‘निवडणूक कधी जाहीर होणार, याबाबत उत्सुकता होती. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामळे आता उमेदवाराच्या नावाचीही घोषणा होईल,’ असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-दांडीयातील भांडणातून चाकूने वार करत अल्पवयीन मुलाचा खून, निगडीतील घटना

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीची लढत अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ‘मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या, बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस राहिलेला नाही,’ असे विधान करून बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत ते बारामतीमधूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने अजित पवार यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींवेळीही युगेंद्र पवार यांनाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी युगेंद्र पवार समर्थकांच्या शिष्टमंडळाने केली होती. तर, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही युगेंद्र हेच उमेदवार असतील, याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे बारामतीची लढत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच होणार असल्याचे म्हटले जाते.

आणखी वाचा-कोजागरीला दुधाला उच्चांकी दर, एक लिटर ८३ रुपये

‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’

‘लोकसभा निवडणुकीत पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्या वेळी पिपाणी चिन्हालाही तुतारी नाव देण्यात आले होते. मात्र, आता ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह अनेकांपर्यंत पोचलेले असल्याने विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह राहिले, तरी त्याने फार काही फरक पडणार नाही,’ असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.