लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : देशाच्या पंतप्रधानांच्या मुंबईतील सभेला पाच हजारही लोक नव्हते. खुर्च्या दीड लाख होत्या. महाराष्ट्राच्या जनतेने आता पंतप्रधानांविरोधात बंड पुकारले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात आले. त्यामुळे येथील तरुणांचे रोजगार हिरावले गेले. आज व्यापारी वृत्तीने देश चालवला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मोदी पाच देशांत जाणार आहेत. रशियालाही जाणार आहेत. ते रशियाला का जातात हे कधी कळले नाही. ट्रम्प निवडून आले ते यांच्यामुळे, कमला निवडून आली असती तरी ती यांच्यामुळे… मात्र, अमेरिकेत कमला हरली, तशी इथे कमळाबाई हरणार आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राऊत बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी, डॉ. रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा

संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्राला कसबा मतदारसंघ रवींद्र धंगेकर यांच्यामुळे माहीत झाला. पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी क्रांतीची मशाल पेटवली. अवघ्या देशाचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले होते. व्ह्यू इज धंगेकर या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले नाही. आताच्या निवडणुकीत मतदार त्यांचे मत बदलतील असे वाटत नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्तेवरची घाण काढून टाकायची आहे. प्रत्येक जागा निवडून आणून पुण्यातील राजकीय कोयता गँग संपवायची आहे. कोयता, चोऱ्यामाऱ्या, अमली पदार्थ, गुन्हेगारी ही पुण्याची ओळख होण्यास येथील आमदार, खासदार जबाबदार आहेत. आम्ही कोयत्याला कोयत्याने उत्तर देऊ शकतो. जिस स्कूल में तुम पढते हो, उस स्कूल के हम हेडमास्टर है…

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी गर्जना लोकमान्य टिळकांनी केली होती. आता महाराष्ट्रातील दळभद्री सरकार घालवायलाच पाहिजे, अशी गुजरातचे गुलाम म्हणून जगावे अशी योजना मोदी-शहा यांनी केली आहे. राज्यातील नेते त्यांच्या ताटाखालचे मांजर होतात. आता निवडणुकीत महाविकास आघाडीची प्रत्येक जागा निवडून आणली पाहिजे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे मोदी-शहा यांचे उद्दिष्ट आहे. फडणवीसांचे सरकार पुन्हा आल्यास मुंबई, विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करतील. शेवटच्या दिवसांत पैशाचा पाऊस पडेल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पैशाचे राज्य आणून महाराष्ट्राची धुळधाण केली आहे. राहुल गांधींच्या नजरेला नजर देण्याची मोदींची हिंमत नाही. मोदी-शहा यांनी राहुल गांधी यांच्यासारखे भारतभर चालून दाखवावे. शिवसेनेकडे पैसा नसला, तरी शिवसेनेच्या फाटक्या उमेदवारांनी भल्याभल्यांना हरवले आहे. भाजपने पैशाची मस्ती आम्हाला दाखवू नये. आम्हाला महाराष्ट्र श्रीमंत करायचा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आणखी वाचा-वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!

गेल्या निवडणुकीत विरोधकांनी निवडणूक हायजॅक केली होती. त्यावेळी रस्त्यावर उतरून काम केले होते. आता त्याच पद्धतीने आताही लढावे लागणार आहे. दीड-दोन वर्षांत दोन विधानसभा, एक लोकसभा लढत आहे. मात्र, कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत, असे रवींद्र धंगेकर यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 mp sanjay raut criticizes bjp in pune pune print news ccp 14 mrj