पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील चुरशीच्या लढतीची परंपरा कायम राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) उमेदवार सुनील टिंगरे यांना चार हजार ५६९ मतांनी पराभूत केले. अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये पठारे यांनी मताधिक्कय मिळवले. पठारे यांच्या विजयामुळे राष्ट्रवादाी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) शहरात ‘तुतारी’ वाजली, अशी चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले होते. पठारे आणि टिंगरे यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. कार्यकर्त्यांचा संच, तसेच यंत्रणेच्या माध्यमातून दोघांनी अधिकाधिक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. आरोप-प्रत्यारोपांमुळे वडगाव शेरीतील निवडणूक चर्चेची ठरली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. वडगाव शेरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वाट्याला आला. मुळीकांची नाराजी दूर करुन त्यांना प्रचारात सक्रीय करण्यात आले. पहिल्या फेरीपासून टिंगरे यांनी मताधिक्य राखले. लोहगाव, विमाननगर, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा भागातून त्यांना मताधिक्कय मिळाले.
\
अठराव्या फेरीपर्यंत टिंगरे यांच्या बाजूने विजय झुकत होता. त्यानंतर शेवटच्या पाच फेऱ्यांमध्ये पठारे यांनी टप्याटप्याने मताधिक्कय मिळवले. वडगावशेरी, खराडी, मांजरी, तसेच येरवडा गावठाणातून पठारे यांनी मताधिक्कय मिळवले. पठारे यांनी टिंगरे यांच्यावर निसटता विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांनी साडेपाच हजार मतांनी मुळीक यांचा पराभव केला होता. निसटता विजयाची परंपरा वडगावशेरी मतदारसंघात कायम राहिली. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर टिंगरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. कल्याणीनगर प्रकरणामुळे टिंगरे यांचे मताधिक्कय घटेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात टिंगरे यांनी अठराव्या फेरीपर्यंत मताधिक्कय राखले. मात्र, अखेरच्या चार फेऱ्यांमध्ये गावकी भावकीचे राजकारण पठारे यांच्या मदतीस आले. वडगावशेरी, मांजरी, खराडी भागातील मतदारांनी पठारे यांना तारले.
मिळालेली मते
बापूसाहेब तुकाराम पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट), मिळालेली मते – एक लाख ३३ हजार १७७
सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट), मिळालेली मते – एक लाख २८ हजार ६०८