पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल हे तिघे मैदानात आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप काल कदम यांनी केला होता. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले होते. आज सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सकाळपासून उत्साही चित्र दिसून येत आहे. मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून अद्यापपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मतदान सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासात पर्वती मतदारसंघात सहा ६.३० टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये पहिल्या दोन तासात किती टक्के मतदान?

पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी ( शरद पवार ) की काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ही जागा जाणार अशी चर्चा बराच काळ चालली. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल आणि राष्ट्रवादीच्या  माजी नगरसेविका अश्विनी कदम हे दोघेजण अनेक महिन्यांपासून विधानसभेची तयारी करीत आले होते. त्यामुळे या दोघांनी पक्षश्रेष्ठीना आपल्याच पक्षाच्या वाट्याला ही जागा सोडली जावी अशी मागणी केली होती. या जागेवरून बराच काळ चर्चा झाल्यावर अखेर ही जागा राष्ट्रवादील सोडण्यात आली आणि अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा >>>पुणेकरांनो, कमी मतदानाची परंपरा आज इतिहासजमा करा!

या मतदारसंघातून ३० वर्षांहून अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल हे निवडून आले आहेत. बागूल यांनी २००९ पासून काँग्रेस श्रेष्ठीकडे पक्षाकडे उमेदवारी मिळावी, यासाठी मागणी करीत आले. परंतु प्रत्येक वेळी आबा बागुल यांना डावलण्यात आले. यंदा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला. त्यामुळे बागूल हे नाराज झाले. त्यावर त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी ( शरद पवार )  पक्षाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होत आहे.