पुणे : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेमध्ये सुरू झाले. उत्साही मतदारांनी सकाळी उन वाढण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले. पहिल्या दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदान झाले.नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशालेत ३१ क्रमांकाचे मशीन काहीवेळ बंद होते. मॉक पोलिंग नंतर अड्रेस टॅग व्यवस्थित न बांधले गेल्याचे आढळून आले. ते परत व्यवस्थित केल्याने मतदान प्रक्रिया ७ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी पत्नीसमवेत थोरले बाजीराव पथावरील नूतन मराठी विद्यालयात मतदान केले. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी बुधवार पेठ येथील नूतन समर्थ विद्यालयात कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. नारायण पेठेतील कन्याशाळा येथे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांग लावली होती.

हेही वाचा >>>पुणेकरांनो, कमी मतदानाची परंपरा आज इतिहासजमा करा!

मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशातून पत्र्या मारुती मित्र मंडळ आणि विजय मित्र मंडळाच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मतदानाची शाई दाखविणाऱ्या नागरिकांसाठी सुदाम्याचे पोहे न्याहरी म्हणून देण्यात आले. साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे मतदान करणाऱ्या मतदारांना पुस्तक भेट देण्यात आले.