पिंपरी : चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांत सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसत असताना दुसरीकडे झोपडपट्टीबहुल असलेल्या पिंपरी मतदारसंघात मतदारांमध्ये मात्र निरुत्साह दिसला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शीलवंत यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळपासूनच पिंपरी मतदारसंघात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. पिंपरी मतदारसंघात बहुतांश झोपडपट्ट्या आहेत. तर, काही भागांत उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्याही आहेत. उच्चभ्रू असलेल्या आकुर्डी, निगडी, प्राधिकरण या भागातील नागरिक स्वतःहून मतदानासाठी बाहेर पडताना दिसले. मध्यमवर्गीय पिंपरी कॅम्प, फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी या भागातील मतदारांना केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.
हेही वाचा >>>बारामतीत राडा… मतदान चिठ्ठ्यांवर घड्याळाचे चिन्ह?
या मतदारसंघात निर्णायक भूमिकेत असलेल्या झोपडपट्टीमधील मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर तुरळक मतदार दिसत होते. मात्र, सायंकाळी पाचनंतर चिंचवड स्टेशन, इंदिरानगर, मोहननगर, आनंदनगर, रामनगर, आंबेडकरनगर, संजय गांधीनगर, खराळवाडी, गांधीनगर, लालटोपीनगर, महात्मा फुलेनगर या झोपडपट्टीबहुल मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. पिंपरीतील कमल नेहरू प्राथमिक शाळा, डीलक्स चौकातील मतदान केंद्रात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासांत अवघ्या ४.०४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकरा वाजेपर्यंत हा आकडा ११.४६ टक्क्यांवर पोहोचला. दुपारी एक वाजेपर्यंत एकूण ८३ हजार ४९२ मतदारांनी आपला हक्क बजावला. या दोन तासांत २१.३४ टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत १ लाख २३ हजार ६६१ म्हणजेच ३१.५८ टक्के मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४२.७२ टक्के मतदान झाले. त्यामध्ये एकूण १ लाख ६७ हजार २९६ मतदारांनी मतदान केले. एकूण ५१.२९ टक्के मतदान झाले आहे.