लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महाविकास आघाडीला आम्ही बरोबर नकोत, हे लोकसभा निवडणुकीत लक्षात आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका आदिवासी, ओबीसी संघटनांना बरोबर घेत स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली.

आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आंबेडकर तसेच नागपूरचे प्रा. अनिकेत मून यांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याची माहिती देण्यासाठी आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. वंचित बहुजनचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची टीका

आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी आठ महिने अगोदरच महाविकास आघाडीतील नेत्यांना सांगितले होते की, आम्हाला बरोबर घ्या. २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, मात्र महाविकास आघाडीने सर्व वेळ चर्चेतच घालविला. त्याचवेळी आमच्या लक्षात आले की, त्यांना आम्हाला बरोबर घ्यायचेच नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक आम्ही आदिवासी तसेच ओबीसी यांच्या संघटनांना बरोबर घेऊन लढविणार आहोत. यातील काही जागा देखील आम्ही जाहीर केल्या आहेत.

आरक्षण हा विकासाचा नव्हे तर प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रतिनिधित्व मिळण्यात बाधा येत आहे. त्यामुळेच या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेनेच अनेक समाज घटकांना व्यवस्थेत आणले आहे. आता तेच या निर्णयाने बाहेर पडले तर प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून सगळा समाज आक्रमक होईल, अशी भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी न्यायालयात जाणार – सुषमा अंधारे

शरद पवार, जरांगे यांच्या भूमिकेवर बोलणे टाळले

मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असावे, ओबीसींचे ताट वेगळे असावे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, ते मागे घ्यावे, अशी मागणी आमची आहे, असे आंबेडकर म्हणाले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांंच्या भूमिका; तसेच सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणावर भाष्य करणे त्यांनी टाळले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 prakash ambedkar announced he will fight independently along with obc organizations pune print news ccm 82 mrj