पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ ‘पॅटर्न’ फेल झाला आहे.पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ ‘पॅटर्न’ला धक्का दिला आहे. आमदार सुनील शेळके पूर्वी भाजपमध्येच होते. २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. भाजपने मावळवर दावा केल्यानंतरही जागा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली. पवार यांनी शेळके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि महायुतीत फूट पडली. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असलेल्या बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने मावळ ‘पॅटर्न’ निर्माण झाला.

हेही वाचा…पिंपरी : मतमोजणीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; किती पोलीस असणार तैनात?

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचेच बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाचे नव्हे तर पदाचे राजीनामे देत बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडी, मनसेनेही बापू यांना पाठिंबा देत या ‘पॅटर्न’ला बळ दिले. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भाजपचे संपूर्ण पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, दिवंगत किशोर आवारे यांची जनसेवा विकास आघाडी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे काही पदाधिकारी बापू यांच्या प्रचारात उतरले होते. तर, शेळके यांनी जवळच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत किल्ला लढविला. नेते अपक्ष उमेदवारासोबत तर जनता शेळके यांच्यासोबत राहिल्याचे मतदानातून दिसून आले आहे. शेळके यांचा सलग दुसऱ्यांदा एकतर्फी विजय झाला आहे. शेळके २०१९ मध्ये ९४ हजार मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा…पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळचा निकाल कधीपर्यंत येणार हाती? प्रशासनाने दिली महत्वाची माहिती

दरम्यान, मावळ मतदार संघात ३,८६, १७२ मतदार आहेत. यापैकी १,४४,२१४ पुरूष, १,३६,१०२ महिला, इतर तीन अशा २,८०,३१९ म्हणजेच ७२.५९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 result ncp ajit pawar party mla sunil shelke wins in maval constituency pune print news ggy 03 sud 02