पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील वडगाव शेरी, खराडी, येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी परिसरातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी नऊपर्यंत मतदान कमी झाले हाेते. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली. वडगाव शेरी मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ५०.४६ टक्के मतदान झाले. वडगाव शेरी मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले.
वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, चंदननगर, खराडी, वडगाव शेरी भागातील मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. वडगाव शेरी मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार, आमदार सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार, माजी आमदार बापू पठारे समाेरासमोर आहेत. टिंगरे आणि पठारे यांच्यातील लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांच्यावर विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघात ४६.९७ टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा >>>मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात वडगाव शेरीतील विविध मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, लक्ष्मीनगर येथील उर्दू हायस्कूल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील मोझे विद्यालय, भिकू पठारे विद्यालय, वडगाव शेरीतील स्टेला मेरीज स्कूल, सेंट अर्नोल्ड स्कूल, विश्रांतवाडीतील विठ्ठलराव गाडगीळ विद्यालय, लोहगाव येथील खेसे विद्यालयातील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी झाली होती.
वडगाव शेरी मतदारसंघात विमाननगर, खराडी, कल्याणीनगर परिसरातील उच्चभ्रू सोसायट्या आहेत. या भागातील मतदान केंद्रात दुपारनंतर गर्दी झाली होती. वडगाव शेरी परिसरात महिलांनी पारंपरिक वेशभूषा, तसेच फेटे परिधान करून मतदान केले.