पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शहर आणि ग्रामीण भागातील विधानसभा निवडणूक इच्छुकांनी मुलाखतींवेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विशेषत: ग्रामीण भागातील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ४१ आणि ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांतील ३७ अशा एकूण ७८ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, कसबा मतदारसंघातून एकमेव इच्छुकाने मुलाखत दिली, तर कोथरूडमधून निवडणूक लढविण्यास तिघे इच्छुक आहेत. उर्वरित मतदारसंघात जोरदार रस्सीखेच मुलाखतीवेळी दिसून आली.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वतीने पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी निसर्ग मंगल कार्यालयात घेण्यात आल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या.
शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळणार आहे. त्या दृष्टीने भाजपचे माजी आमदार बापू पठारे यांनी काही दिवसांपूर्वी या पक्षात प्रवेश केला होता. त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत या मतदारसंघातून सात इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाजीनगरमध्येही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास आठ इच्छुक आहेत. पर्वतीमध्ये चार, हडपसरमध्ये पाच, खडकवासल्यात नऊ इच्छुक आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमधून पाच, तर कोथरूडमधून तीन आणि कसब्यातून एकाने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>>अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र; जाणून घ्या किनारपट्टी, पश्चिम घाटासाठीचा अंदाज
या इच्छुकांमध्ये अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळते, यावरच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला किमान तीन मतदारसंघ मिळण्याची शक्यता असून, पक्षाने यापूर्वीच खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघांवर दावा केला आहे. या तिन्ही मतदारसंघांत जोरदार रस्सीखेच असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबतही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.