मागील विधानसभा निवडणुकीत मिसाळ आणि कदम यांच्यात लढत झाली होती. यंदा दोघी पुन्हा आमनेसामने होत्या. गेल्या वेळी मिसाळ यांना ९७ हजार १२ तर कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. यावेळी बागुल यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता होती. गेल्या वेळी या मतदारसंघात ४९.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.२६ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाच्या टक्क्यात सुमारे सहा टक्के वाढ झाली. हा वाढलेला मतटक्काही महत्त्वाचा ठरला.
हेही वाचा…हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी
पहिल्या फेरीपासून आघाडी
आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून मिसाळ यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत २० व्या फेरीअखेर त्या ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यांना १ लाख १७ हजार ८८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कदम ६७ हजार ३७३ मते मिळाली. काँग्रेस बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना १० हजार ४४६ मते मिळाली. विशेष म्हणजे, यंदा एकूण तीन अश्विनी कदम मैदानात होत्या. त्यातील पहिल्या अपक्ष अश्विनी अनिल कदम आणि दुसऱ्या अपक्ष अश्विनी नितीन कदम चार आकडी मतसंख्या ही गाठता आली नाही.
हेही वाचा…पिंपरी विधानसभा: अजित पवार मंत्रीपद देतील; विजयानंतर अण्णा बनसोडे यांचा विश्वास
बंडखोरीचा फटका
भाजप आणि माधुरी मिसाळ यांच्यासमोर हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान होते. याच वेळी मागील वेळचा पराभव विजयात परिवर्तित करण्याचे आव्हान अश्विनी कदम यांच्यासमोर होते. या मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे वारे होते. महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आले. मात्र, महाविकास आघाडीला आबा बागुल यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे.