पिंपरी : राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरातील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप आणि अपक्ष भाऊसाहेब भाेईर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. चिंचवडमध्ये ६,६३,६२२ मतदार आहेत. या मतदारसंघातील चिंचवडगाव, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, जुनी-नवी सांगवी, वाकड, रावेत, किवळे, पुनावळे या भागात मोठ्या संख्येने गृहनिर्माण सोसायट्या आहेत. येथील मतदारांनी सकाळपासून मतदानासाठी गर्दी केली होती. केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सत्रात मतदान करण्यावर या भागातील मतदारांचा कल दिसून आला. तर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी भागातील मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसले.
हेही वाचा >>>Maharashtra Election 2024 : ‘मतदान शांततेत, अनुचित घटना नाहीत’; सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा
चिंचवडमध्ये पहिल्या दाेन तासांत ६.८० टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळच्या सत्रात १,१२,६४७ मतदारांनी मतदान केले. दुपारी एक वाजेपर्यंत २९.३४ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग मंदावला. तीन वाजेपर्यंत ४०.४३ टक्के मतदान झाले. २,६८,३२३ मतदारांनी हक्क बजाविला. पाच वाजेपर्यंत ३,३१,८६१ मतदारांनी आपला हक्क बजाविला. ही मतांची टक्केवारी ५०.१ टक्के हाेती. एकूण ५६.७३ टक्के मतदान झाले.
हेही वाचा >>>‘भाजपला मतदान करा नाही तर बघून घेतो’, सुनील कांबळेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज
चिंचवड विधानसभेतील साने गुरुजी आदर्श विद्यानिकेतन शाळा, जय मल्हारनगर, थेरगाव येथील २९० ते २९३ क्रमांकाच्या बूथवर, तर कीर्तीनगर येथील न्यू मिलेनिअम इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील मतदान केंद्रावरील २६४ ते २६८ क्रमांकाच्या बूथवर पैसे वाटप होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली. तसेच काही बूथवर मतदान केंद्राबाहेर लावलेल्या उमेदवारयादीत जाणीवपूर्वक आपले नाव अस्पष्ट दिसेल, असे करण्यात आल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. तर, वाकड येथील ऊड्स शाळेतील मतदान केंद्राबाहेर शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करणाऱ्या सजग नागरिक मंचाच्या कार्यकर्त्याला कलाटे यांनी मारहाण, शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप उमेदवार शंकर जगताप यांनी केला.