पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे वाहननिर्मिती उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या चाकण एमआयडीसीतील सुमारे ५० कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध करताच सत्ताधाऱ्यांची या मुद्द्यावरून कोंडी करीत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीत जागतिक पातळीवरील मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, ब्रिजस्टोन, ॲटलास कॉप्कोसह अनेक कंपन्या आहेत. येथील वाहतूककोंडीसह अपुऱ्या पायाभूत सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ५० कंपन्या चाकण एमआयडीसीतून येथून गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यात स्थलांतरित झाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून लोकसत्ताने उद्योगांच्या कोंडीला वाचा फोडली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता हा मुद्दा चांगलाच तापला आहे.
हेही वाचा >>>पुणे: रास्ता पेठेत ११ लाखांचा गुटखा जप्त; अमली पदार्थ विरोधी विभागाकडून दोघांना अटक
यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी यावरून राज्य सरकारला खडे बोल सुनावले. याचबरोबर त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारला अनेक प्रश्न विचारले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला याप्रकरणी धारेवर धरले. याचबरोबर शिवसेना उबाठा गट, युवक काँग्रेसने समाजमाध्यमांवरून सरकारला घेरण्याची रणनीती अवलंबिली. या सर्व गदारोळात सरकारकडून मात्र मौन धारण करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>भोसरी विधानसभा: विलास लांडेंचं ठरलं; या दिवशी करणार शरद पवार गटात प्रवेश; मुलानेच दिली माहिती
एक उद्योग जातो, तेव्हा त्यासोबत राज्याचा महसूल जातोच; पण रोजगाराच्या शक्यताही जातात. कित्येक स्थानिकांचा रोजगार त्यामुळे हिरावला गेला आहे. कंपन्या पलायनाचे हे सातत्य राहिले, तर चाकण एमआयडीसी बंद पडायला वेळ लागणार नाही.- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
महाराष्ट्रातील सर्वांत चर्चित एमआयडीसींपैकी एक असणाऱ्या चाकण एमआयडीसीतून एक-दोन नाही तर ५० कंपन्या बाहेर गेल्या. राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यांत निघून गेला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे याबाबत काय म्हणणे आहे?- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविणे महायुती सरकारला जमले नाही, वरून आधीपासून असलेली गुंतवणूक आणि उद्योग यांना टिकवून ठेवता आले नाहीत. चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने उद्योगांना इतर राज्यांत स्थलांतरित व्हावे लागले.- विजय वडेट्टीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस
मुंबईपाठोपाठ पुणे हे महाराष्ट्राच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल टाकणारे शहर आहे. देशातील अव्वल ३० निर्यातदार शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक पाचवा लागतो. पुण्यातून असे घाऊक पद्धतीने उद्योग जाऊ लागले, तर पुण्याचा क्रमांक खालून पाचवा असेल. उद्योगांना गुजरातचा मार्ग कोणी दाखविला?- अंबादास दानवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, शिवसेना उबाठा गट