दिवाळी हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची पर्वणी घेऊन येणारा महत्त्वाचा सण. गोडधोडाचे फराळाचे पदार्थ, मिठाई, सुकामेवा, मिष्टान्न भोजन… नवे कपडे परिधान करण्याबरोबरच किल्ला करून फटाके उडविण्यामध्ये आनंद लुटणारे बाळगोपाळ… लाडू, चकल्या, कडबोळी, चिवडा, करंजी, शंकरपाळी, अनारसे या फराळाच्या जिन्नसाबरोबरच ‘अक्षर फराळ’ असा लौकिक प्राप्त केलेल्या विविध विषयांना वाहिलेल्या दिवाळी अंकांचे वाचन अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसांकडून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो. या आनंदामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमांची भर पडली आहे.

अभिजात सुरांसवे दिवाळीचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या दिवाळी पहाट या उपक्रमाची संकल्पना मुंबईमध्ये चतुरंग प्रतिष्ठानाने सुरू केली. त्यानंतर लगेचच पुण्यामध्ये त्रिदल, पुणे आणि संवाद, पुणे या संस्थांनी दिवाळी पहाट उपक्रमाचा कित्ता गिरवला. त्रिदल, पुणे संस्थेची दिवाळी पहाट नरक चतुर्दशीला, तर संवाद संस्थेची दिवाळी पहाट पाडव्याला असे समीकरण जुळून गेले. दिवाळी पहाट उपक्रमाला मिळणारा रसिकांचा प्रतिसाद ध्यानात घेता अनेक संस्था यामध्ये कार्यरत झाल्या. दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येने बाळसे धरू लागले. गेल्या काही वर्षांत तर, रमा एकादशीपासून ते भाऊबीज अशा संपूर्ण दिवाळीभर दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. इतकेच नव्हे, तर दिवाळी संध्या कार्यक्रमांच्या आयोजनालाही पुणेकरांचा प्रतिसाद लाभतो.

आणखी वाचा-पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना

दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे ही बाब राजकीय नेत्यांनी हेरली आणि गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या संख्येत लक्षणीय भर पडू लागली आहे. शहरातील नाट्यगृहे, लॉन्स आणि उद्यानांमध्ये आगाऊ आरक्षण करून दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रथितयश कलाकारांबरोबरच युवा कलाकारांच्या कलाविष्काराला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमुळे कलाकारांनाही ‘अच्छे दिन’ आले आणि रसिकांच्या आनंदात भर घालण्यासाठी नव्या रचनांच्या सादरीकरणातून कलाकारही आनंदाची प्रचिती घेऊ लागले.

यंदाच्या दिवाळीमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या संख्येमध्ये मोठी भर पडली आहे. राजकीय नेत्यांकडूनच दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने रसिकांना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. निवडणुकीच्या कामकाजासाठी गणेश कला क्रीडा मंच आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ही दोन महत्त्वाची नाट्यगृहे अन्य कार्यक्रमांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या आयोजकांना नव्या ठिकाणांचा शोध घ्यावा लागत आहे. एकूणच ‘उदंड जाहल्या दिवाळी पहाट’ अशीच परिस्थिती झाली आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमांची वाढती संख्या हे सांस्कृतिक उन्नयन आहे की सूज, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

आणखी वाचा-पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त

साहित्य, कला आणि संस्कृतीचे माहेरघर असा पुण्याचा लौकिक आहे. त्यामुळे पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची सदैव रेलचेल असते. त्यामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येने मोठीच भर घातली गेली आहे. ‘ज्याला पुण्यात मान्यता मिळते त्या कलाकाराचा जगभरात गौरव होतो’, हे संगीतमार्तंड पं. जसराज यांचे उद्गार पुण्यातील रसिकत्वाचे यथार्थ वर्णन करणारे आहेत. त्या रसिकत्वाला आनंद देण्यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रम सज्ज झाले आहेत. दिवाळी येते आणि जाते; पण, त्या निमित्ताने आपल्या आवडत्या कलाकाराचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांसाठी आयुष्यभर ‘स्मृतींच्या कोंदणात’ जपणारा आनंद देऊन जाते, ही बाब निश्चितच वाखाणण्याजोगी आहे यात शंकाच नाही.