पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकनासाठीचे निकष नुकतेच जाहीर केले आहेत. त्यात मूल्यांकनासाठीच्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र गुणभार असून, आता नव्या निकषांच्या आधारे उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकन बंधनकारक आहे. नॅक मूल्यांकन हा गुणवत्तेचा महत्त्वपूर्ण निकष मानला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. नॅक मूल्यांकन बंधनकारक असूनही देशभरातील अनेक उच्च शिक्षण संस्थांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच नॅक मूल्यांकन प्रक्रियेत उच्च मूल्यांकन श्रेणी मिळण्यासाठी खासगी सल्लागाराची मदत घेण्यासारखे प्रकारही निदर्शनास आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पार्श्वभूमीवर आता ‘यूजीसी’कडून मूल्यांकनातील निकष बदलण्यात आले आहेत. स्वायत्त महाविद्यालये, संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे स्वतंत्र निकष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आतापर्यंत मूल्यांकनाचा आराखडा निश्चित होता. मात्र, त्यासाठीचा गुणभार जाहीर करण्यात आलेला नव्हता. विद्यापीठांच्या मूल्यांकनासाठी अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन आणि नवोपक्रम, पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्रोत, प्रशासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती हे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र गुणभार देण्यात आला आहे. तसेच स्वायत्त महाविद्यालये आणि संलग्नित महाविद्यालयांसाठीच्या निकषांमध्ये अंतर्गत गुणवत्ता सिद्धता, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम कृती हे दोन स्वतंत्र घटक आहेत.

नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निकष आणि त्यासाठीचा गुणभार जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांचे कोणत्या निकषांवर मूल्यमापन होणार, हे समजू शकेल. या निकषांवर हरकती-सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. आता महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांची गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न करता येतील. – डॉ. भूषण पटवर्धन, कार्यकारी अध्यक्ष, नॅक

नॅककडून निकष जाहीर करण्यात आल्यामुळे मूल्यमापन कोणत्या निकषांच्या आधारे होईल हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रक्रियेत आता पारदर्शकता आली आहे. हे निकष जाहीर झाल्यामुळे महाविद्यालयांना काय पद्धतीने काम केले पाहिजे हे नेमकेपणाने समजू शकेल. – डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assessment of higher education institutions through new criteria amy