पिंपरी : शहरातील तीन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यावसायिक, औद्याेगिक, निवासी मालमत्ता महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. तीन लाखांपुढे थकबाकी असलेल्या १६५१, तर पाच लाखांपुढे थकबाकी असलेल्या १०३२ अशा २६८३ मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे दाेनशे काेटी रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्ता जप्तीची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातील ६,३३,२९४ मालमत्तांची महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडे नोंद आहे. त्यात सर्वाधिक ५,४१,१६८ मालमत्ता निवासी, तर ५७,७३३ बिगरनिवासी आहेत. तसेच, औद्योगिक ४५६३, मोकळ्या जमिनी ११,२३२, मिश्र १६००१ आणि इतर २५०६ मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत ५५० कोटी रुपयांचा मालमत्ताकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आतापर्यंत तीन लाख ७९ हजार मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. त्यात थकबाकी ८९ कोटी ८० लाख रुपये, तर ४४७ कोटी ६१ लाख रुपये ही चालू मागणी आहे. त्यात सर्वाधिक ३६२ कोटी ७४ लाख रुपये ऑनलाइन जमा झाले आहेत. आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे ४२ कोटी, रोख ४१ कोटी ६६ लाख, धनादेशाद्वारे ३७ कोटी ९७ लाख रुपये जमा झाले आहेत.

हेही वाचा…….तर प्राध्यापक भरती आणखी सहा महिने लांबणीवर?

सर्वाधिक ८३ कोटी ६० लाखांचा मालमत्ताकर वाकड विभागीय कार्यालयाकडून जमा झाला आहे. त्या पाठोपाठ ५० कोटी ६७ लाखांचा कर थेरगाव कार्यालयात भरला गेला आहे. चिखलीतून ४२ कोटी ७३ लाख, पिंपरीगावातून ३७ कोटी ८२ लाख आणि भोसरीतून ३७ कोटी ६२ लाख रुपयांचा कर जमा करण्यात आला आहे.

गतवर्षीपेक्षा ८३ काेटी कमी

गतवर्षी पहिल्या नऊ महिन्यांत ६३३ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा त्या तुलनेत ८३ काेटींनी वसुली कमी झाली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे ठप्प झालेल्या कामकाजाचा परिणाम वसुलीवर झाला आहे.

हेही वाचा…पिंपरी : मोटारीने धडक देऊन तरुणाला मारण्याचा प्रयत्न; बोनेटवरून…

तीन लाखांपुढे थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २६८३ मालमत्ताधारकांकडे २०३ काेटींची थकबाकी आहे. या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी जप्त केलेल्या ४३ मालमत्तांच्या लिलावाची प्रकिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assets outstanding beyond three lakhs will be seized by municipal orporation pune print news ggy 03 sud 02