लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात राहणाऱ्या आणि डेंगीसदृश्य आजाराने मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. लवकरच दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना धनादेशाद्वारे ही मदत दिली जाणार आहे.

महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घोले रस्ता येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह चालवले जाते. या वसतिगृहात राहणाऱ्या वेदांत सुभाष सोनवणे या मॉडर्न महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या तसेच सिंहगड महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या सिद्धांत दीपक खैरे या दोन विद्यार्थ्यांचा जुलै २०२४ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर विविध राजकीय संघटना विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

या दोन्ही विद्यार्थ्यांना वसतीगृहात डेंगी सदृश्य आजार झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात होता. या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी ६ ऑगस्ट २०२४ रोजी अधिकाऱ्यांबरोबर वसतिगृहाची पाहणी केली होती. त्यानंतर या वसतिगृहात आवश्यक सुधारणा करण्याचे काम केले गेले. दरम्यान, दोन्ही मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक कुटुंबास पाच लाख रुपयांपर्यंत मदत करणे, योग्य राहील, असे प्रशासनाचे म्हणणे होते.

वसतीगृहात राहणारा वेदांत सोनवणे हा वसतीगृह प्रशासनाला पूर्वकल्पना न देता पोलिस भरतीसाठी ठाणे येथे गेला होता. तेथून आल्यानंतर तो आजारी पडला. तर सिद्धांत खैरे आजारी पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला कल्याणमधील रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याचे निधन झाले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू महापालिकेच्या वसतिगृहात झालेला नाही, असे पालिकेच्या प्रस्तावात म्हटले आहे.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शिल्लक असलेल्या तरतुदीमधून ही रक्कम देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. बालकल्याण समितीमार्फत स्थायी समितीमार्फत हा प्रस्ताव मान्य झाला. आता हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे सादर होईल. त्यानंतर धनादेशाद्वारे ही रक्कम संबंधित कुटुंबीयांना दिली जाणार आहे.

Story img Loader