लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरात विविध भागांतून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असताना महापालिकेकडून मोफत पाण्याचे टँकर पुरविण्यात येत आहेत. मात्र, अनेक भागांत टँकर आणि त्यामुळे पाणी पोहोचतच नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांच्या नोंदपुस्तकात संबंधित भागातील सहायक आयुक्तांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांवर टँकरच्या फेऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने पाणीचोरीला आता चाप बसणार आहे.

उन्हाळा सुरू होताच पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात टँकरची मागणी दहा हजारांनी वाढलेली आहे. फेब्रुवारीमध्ये ३८ हजार ५२२ टँकरद्वारे नागरिकांना पाणी देण्यात आले, तर मार्च महिन्यात टँकरची संख्या ४७ हजार ८९६ इतकी झाली आहे. एप्रिल आणि मेमध्ये टँकरच्या संख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.

अपुरा पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने टँकरने पाणी दिले जाते. मात्र, अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे याची शहानिशा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. टँकरच्या दिवसभरात किती फेऱ्या होतात आणि हे टँकर कुठे जातात, यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने टँकरच्या फेऱ्यांच्या नोंद वहीमध्ये संबंधित भागातील सहायक आयुक्तांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर टँकरच्या फेऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. परिणामी, पाणीचोरीला चाप बसणार आहे.

शहरातील काही भागांत राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेचे पाण्याचे टँकर परस्पर रिकामे करून घेतले जात असल्याच्या तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत. याची शहानिशा करण्याचा निर्णयदेखील महापालिकेने घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये ४ लाख ४ हजार ३४० टँकरमधून शहरातील विविध भागांमध्ये पाणी देण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

‘जीपीएस’ यंत्रणा असतानाही पाणीचोरी?

पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेने टँकरला जीपीएस यंत्रणा लावली. मात्र, ही यंत्रणा असतानाही पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती घेण्याचे संकेत दिले. उन्हाळा वाढत असल्याने टँकर नक्की कोठे जातात, याचा शोध घेण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी केल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.