पुणे : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केल्यानंतर त्याच ठिकाणी नवीन वीजजोडणी दिल्याप्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्याने राजगुरुनगर विभागातील कामशेत शाखेचे सहायक अभियंता प्रमोद महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी आणखी सखोल चौकशी करण्यात येत आहे.
महावितरणच्या राजगुरुनगर विभागातील वडगाव मावळ उपविभागअंतर्गत कामशेत शाखेमध्ये ताजे (ता. मावळ) येथील एका जागेवर ८१ हजार ५२० रुपयांची थकबाकी असताना त्याच ठिकाणी प्लॉटिंग स्कीमसाठी नवीन वीजजोडणी देण्यात आल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाली होती. त्याची तातडीने गंभीर दखल घेत महावितरणकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये राजगुरुनगर विभागीय कार्यालयाने केलेल्या चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये थकबाकी असलेल्या जागेवर नव्याने वीजयंत्रणा उभारून नवीन वीजजोडणी देण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच या प्लॉटिंगमध्ये तीन ग्राहकांना नवीन वीजजोडणी देऊन वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
या चौकशीमध्ये आढळलेल्या तथ्यासंदर्भात प्राथमिक जबाबदारी असलेले कामशेतचे सहायक अभियंता प्रमोद महाजन यांनी नवीन वीजजोडणीबाबत मंजुरीचे, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे विभागीय कार्यालयाकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही सादर केली नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महावितरणकडून महाजन यांना निलंबित करण्यात आले.