पुणे : ठेकेदाराला वीज मीटर मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या धानोरी कार्यालयातील सहायक अभियंता महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
हर्षाली ओम ढवळे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंता महिलेचे नाव आहे. याबाबत एका ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार एका विद्युत ठेकेदाराकडे कामाला आहे. वीज मीटर मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार महावितरणच्या धानोरी कार्यालयात गेला होता. त्या वेळी ढवळे यांनी पूर्वीच्या थ्री फेज मीटरच्या कामासाठी आणि नवीन मीटर बसविण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा ढवळे यांनी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती बारा हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस झाले. सापळा लावून ढवळे यांना पकडण्यात आले.
हेही वाचा – मुंबई, पुण्यात मोसमी पाऊस सुरू, एकाच दिवसांत व्यापला देशाचा मोठा भाग
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करत आहेत.