लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडे ६० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पिंपळेसौदागर पोलीस चौकी येथे करण्यात आली.

सुनील शहाजी जाधव (वय ४९) असे रंगेहाथ पकडलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ते सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेच्या घराचे बांधकाम पिंपळेसौदागर येथे चालू आहे. या बांधकामाचे कंत्राट बांधकाम व्यवसायिक कराळे यांना दिले होते. घराच्या बांधकामाबाबत ठेकेदार कराळे व तक्रारदार यांच्यात करार झाला होता. करारानुसार बांधकाम व्यवसायिक यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. तक्रारदार यांच्या ताब्यात असलेले बांधकामाचे साहित्य ठेकेदार हे तक्रारदार यांच्याकडे मागत होते. परंतु, बांधकाम पूर्ण झाल्यावर कराळे यांचे बांधकाम साहित्य देण्यात येईल, असे तक्रारदार यांनी कराळे यांना सांगितले. त्यामुळे कराळे यांनी तक्रारदार यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

आणखी वाचा-पुणे: वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व मार्गावरील भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात

या तक्रारीवरून तक्रारदार यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे पहिल्यांदा ६० हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तसेच, ५० हजाराची लाचेची रक्कम दोन टप्प्यात देण्यास सांगितले. याप्रकरणी तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली आणि सापळा रचला. पिंपळे – सौदागर पोलीस चौकी येथे तक्रारदार यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील २५ हजार रूपये लाच स्वीकारताना जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant police officer in jail while accepting bribe of 50 thousand for not filing case pune print news ggy 03 mrj
First published on: 19-10-2023 at 14:30 IST