लाड शाखीय वाणी समाज हा रोजगार देणारा समाज आहे. अशा कर्मयोगी समाजाच्या पाठीशी सरकार सदैव उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारुंजी येथील समाजाच्या महाअधिवेशनात दिले. समाजाने केलेल्या मागणीनुसार पुणे आणि नाशिक येथे समाजातर्फे बांधल्या जाणाऱ्या विद्यार्थी वसतिगृहासीठी सरकार जागा देईल, असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, शाम शेंडे, गोपाळराव केले, अभय केले, अनिल चितोडकर, अभय नेरकर, जगदीश चिंचोरे, आर. एम. वाणी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, वाणी समाजाला मोठा इतिहास आहे. अनेक संघर्षांना तोंड देऊन समाजाने आपले अस्तित्व टिकवले आहे. स्वातंत्र्यलढय़ात या समाजाचा मोठा सहभाग होता. व्यापार आणि उद्योगात वाणी समाजाने उत्तम कामगिरी केली आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी त्याठिकाणी वाणी समाजातील दोन, तीन यशस्वी मंडळी आपल्याला पहायला मिळतील.

वाणी समाजातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे. या वसतिगृहाला राज्य सरकार जागा उपलब्ध करुन देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले. प्रास्ताविक कैलाश वाणी यांनी केले.