दिवाळीत हवा प्रदूषणात मोठी वाढ होत असल्यामुळे ज्यांना आधीपासूनच श्वसनाच्या तक्रारी आहेत त्यांचा त्रास ७० ते ८० टक्के वाढत असून दमेकऱ्यांपैकी ज्यांना कमी त्रास आहे त्यांचाही त्रास वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यातही लक्ष्मीपूजनाला फटाके सर्वाधिक उडवले जात असल्याने त्या दिवशी अशा व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दिवाळीत खाल्ल्या जाणाऱ्या जड व तेलकट पदार्थामुळे अनेकांना आम्लपित्ताचाही (अॅसिड रीफ्लक्स) त्रास होतो. ज्या व्यक्तींना दमा, श्वसनाच्या तक्रारी किंवा अॅलर्जीचा त्रास आहे त्यांना अशा अॅसिड रीफ्लक्समुळे अधिक त्रास होतो. ‘कोणताही आधीचा त्रास नसलेले लोकही या दिवसात कोरडा खोकला घेऊन येतात. त्यांच्यात अॅसिड रीफ्लक्समुळे आम्ल घशापर्यंत येऊन घशाला खवखव व खोकला सुरू झाल्याचे दिसून येते,’ अशी माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. श्रीरंग उपासनी यांनी दिली. ते म्हणाले,‘ऑक्टोबरच्या शेवटी हवामानबदलामुळे श्वसनमार्गाचा त्रास, अॅलर्जी व दम्याचे रुग्ण येऊ लागतात. दिवाळीत फटाके आणि जड खाणे सुरू झाले की त्यांच्या तक्रारीत वाढ झालेली पाहायला मिळते. धुके आणि फटाक्यांचा धूर हे वातावरण त्रासाला पोषकच ठरते. आधीपासून त्रास असलेल्यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकारात्मक जीवनशैली अवलंबणे गरजेचे आहे. फटाक्यांचा खूप धूर असताना किंवा सकाळच्या धुक्यात बाहेर जाणे टाळणे, बाहेर जाताना नाका-तोंडावर रुमाल बांधणे असे काही प्रतिबंधक उपाय असू शकतात. खोकला, शिंका, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे ही या प्रकारच्या समस्यांची सर्वसाधारण लक्षणे आहेत. यातही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.’
दरवर्षी दिवाळीनंतर फटाक्यांच्या धरामुळे दमेकऱ्यांच्या त्रासासह दम्याच्या नवीन रुग्णांची संख्याही वाढते. यात १० ते १२ वर्षांची मुले अधिक असतात, असे दमाविकार तज्ज्ञ डॉ. महावीर मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्रतिजैविकांनी बरा न होणारा कोरडा खोकला, श्वासातून शिट्टीसारखा आवाज येणे, दम लागणे अशी प्रमुख लक्षणे पाहायला मिळतात. दिवाळीनंतर फटाक्यांच्या धुराने त्रास झालेले दररोज ३ ते ४ रुग्ण दवाखान्यात येतात. फटाक्यांच्या धुरात असलेले सूक्ष्म कण ५ मायक्रॉनपेक्षा लहान असल्यामुळे नाका-तोंडावर फडके बांधून देखील त्याचा विशेष उपयोग होत नाही, तरी त्रास असलेल्यांनी शक्यतो रुमाल वा मास्क वापरावा.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा