निवडणुकांच्या तोंडावर राजकीय लोकांचा ज्योतिषांप्रती असलेल्या अनुनयातील फोलपणा सिद्ध करण्यासाठी  लोकसभा निवडणुकांचे अचूक अंदाज वर्तवा, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना दिले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ज्योतिष हे शास्त्र असल्याचा दावा करणाऱ्या ज्योतिषांचा पर्दाफाश करण्यासाठी हे आव्हान देण्यात आले आहे.
निवडणुकांच्या कालावधीत अनेकांना अंदाज वर्तविण्याची ऊर्मी असते. काही जण आपल्यातील अतींद्रिय शक्ती, भविष्यकथनातील जाण आणि ग्रहदशा यांच्या अभ्यासानुसार अंदाज वर्तविण्याचे दावे करतात. या दाव्यातील फोलपणा सिद्ध करण्याच्या उद्देशातूनच ज्योतिषांना हे आव्हान देण्यात आले आहे. त्यानुसार निवडणूक निकालाचे अचूक अंदाज वर्तविणाऱ्या ज्योतिषांसाठी २१ लाख रुपयांचे पारितोषिकजिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वत:ला ज्योतिषी, भविष्यवेत्ता समजणारी व्यक्ती आणि इतर लोक ज्यांना ज्योतिषी समजतात अशा व्यक्ती, ज्योतिषांची संस्था, मंडळे यापैकी कोणीही हे आव्हान स्वीकारू शकतात.
लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी विविध पक्ष, त्यांच्या आघाडय़ा, राज्यनिहाय निवडून येणारे उमेदवार तसेच पक्षांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी, एकूण मतांपैकी निवडून येणाऱ्या जागा, देशातील महत्त्वाच्या उमेदवारांचे जय-पराजय, त्यांच्या मतांची टक्केवारी आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांपैकी पक्षनिहाय आणि महत्त्वपूर्ण उमेदवारनिहाय मतांची टक्केवारी या विषयीचे भविष्य या आव्हान प्रक्रियेत स्वतंत्रपणे पाठविले जातील. यामध्ये सहभागी होऊ इछिणाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत पोहोचतील, अशा बेताने आपली सहभागाची संमती आणि पाच हजार रुपये अनामत रकमेचा धनादेश समितीकडे पाठविणे आवश्यक आहे, असे समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले. फलज्योतिषाच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळामध्ये संशोधक, राजकीय विश्लेषक, गणिती अभ्यासक, खगोलतज्ज्ञ यांचा समावेश आहे. या मंडळाचा निर्णय अंतिम असून विजेत्या ज्योतिषाला २१ लाख रुपयांची ठेव जमा पावती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी प्रा. नितीन शिंदे (मो. क्र. ९८६०४३८२०८) यांच्याशी संपर्क साधावा.
ग्राहक संरक्षण कायदा
ज्योतिषांना लागू करावा
ज्योतिष हे शास्त्र नसून ती कला आहे. ज्योतिषाच्या जाहिराती प्रसिद्ध होतात. त्यांच्याकडे जाणारे लोक हे त्यांचे ग्राहक असतात. त्यामुळे ब्रिटनच्या धर्तीवर भारतामध्येही ग्राहक संरक्षण कायदा ज्योतिषांना लागू करावा, अशी मागणी अविनाश पाटील यांनी केली. त्यामुळे वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही, तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा