काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी डोळे वटारल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मरगळ झटकून आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणीच्या कामाला सुरुवात केली. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करू नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. मात्र, ‘हायकमांड’ ने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत व्यवहार्य ठरणार नसेल, तर किमान विधानसभा तरी स्वतंत्रपणे लढाव्यात, असा सूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आळवला आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राहुल गांधी यांनी राज्यात लक्ष घातले असून आतापर्यंतच्या संघटनात्मक कामात बदल केले आहेत. पक्षातील मरगळ दूर करण्याबरोबरच तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय बैठका, वचनपूर्ती मेळावे तसेच कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरांचा कालबद्ध व ‘हायटेक’ कार्यक्रम त्यांनी दिला आहे. त्यानुसार ठाकरे यांनी वाटचाल सुरू केली असून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची चिंचवडला झालेली बैठक त्याचाच एक भाग आहे. यापूर्वी, अमरावती, नागपूरला अशा बैठका झाल्या असून ठाणे, औरंगाबाद, शिर्डी येथे प्रस्तावित आहेत. अशा बैठकांमधून राष्ट्रवादीच्या बाबतीत नकारार्थीच सूर व्यक्त झाल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत फरफटत जाऊ नये, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे, राष्ट्रवादी हाच काँग्रेसचा प्रमुख शत्रू पक्ष आहे. त्यांच्याशी आघाडी कायम ठेवणे आत्मघात ठरेल, त्यासाठी आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात, अशा भावना व्यक्त होत आहेत.
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेसने २६ तर राष्ट्रवादीने २२ जागा लढवल्या आहेत. काँग्रेसशी आघाडी निश्चित असल्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले. काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसली तरी वाटचाल त्या दिशेने आहे. तथापि, आघाडी, जागावाटप, मतदारसंघांची अदलाबदल याविषयी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आपण कार्यकर्त्यांच्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचवू, असे माणिकरावांनी स्पष्ट केले आहे. सत्ता असूनही कामे होत नाहीत, जिथे-तिथे राष्ट्रवादीची दादागिरी सहन करावी लागते, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मुख्य तक्रार आहे. मात्र, त्याविषयी काँग्रेस नेत्यांकडे समाधानकारक उत्तर नाही. महामंडळे, तालुका-जिल्हा कमिटय़ा जाहीर होत नाहीत. विशेष कार्यकारी अधिकारीसारखी पदेही न मिळाल्याने सामान्य कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षात कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, नेते स्वार्थासाठी सत्तेचा उपभोग घेतात, पक्षासाठी काही करत नाही, अशी भावना आहे. खुद्द माणिकरावांच्या कार्यपद्धतीविषयी पक्षात तीव्र नाराजी आहे. प्रदेशाध्यक्षपदाची ‘इनिंग’ झाल्यानंतर माणिकरावांना मंत्रिपदाचे वेध लागलेत. संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच कार्यपद्धतीविषयीच पुणे जिल्ह्य़ातील तसेच कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांच्याच तक्रारी आहेत. अशा अनेक प्रतिकूल गोष्टींचा सामना करून सत्ता कायम राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.