मळवली रेल्वे स्थानकावर एका महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या साखळी चोराला पकडून नागरिकांनी चांगला चोप दिला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साखळीचोराचा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या अज्ञात प्रवाशांवर या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिन इब्राहिम तांबोळी (वय ३०, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी मळवली रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना एका महिलेची तांबोळी याने सोनसाखळी हिसकावली. त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील प्रवाशांनी त्याला पकडले. त्या ठिकाणी तांबोळीला प्रवाशांनी चांगला चोप दिला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला अगोदर स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणाहून त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात तांबोळी विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा तर अज्ञात प्रवाशांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कोणी मारहाण केली याची माहिती घेण्यात येत असून मारहाण करतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळते का, या शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे तपास करत आहेत.

Story img Loader