पुणे : पुणे स्टेशन परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक लाख ६९ हजार रुपयांचे आठ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेबाज शब्बीर कुरेशी (वय २४, रा. लष्कर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर आणि पथक गस्त घालत होते. पुणे स्टेशन परिसरात एक जण थांबला असून त्याच्याकडे मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ असल्याची माहिती पथकाला मिळाली.
हेही वाचा : “घटनाबाह्य खोके सरकार पुन्हा डोक्यावर बसले तर मंत्रालय…”, आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कुरेशीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून आठ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत एक लाख ६९ हजार रुपये आहे. याप्रकरणी कुरेशीविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, चेतन गायकवाड, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, महेश साळुंखे यांनी ही कारवाई केली.