पुणे : किरकोळ वादातून मामाने १५ वर्षीय भाच्याच्या छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात शुक्रवारी रात्री घडली. पसार झालेल्या मामाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली.

गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी, कोळीवाड्याजवळ, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मेधनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याला अटक करण्यात आली. याबाबत आरोपी मेघनाथचा मेहुणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (वय ३१, रा. कृष्णाईनगर, मानाजीनगर गणपती मंदिराजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता.

शुक्रवारी रात्री त्याचा मामाच्या मुलाशी वाद झाला. वादातून मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या छातीवर वार केला. चाकूने भाेसकल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी अवस्थेतील गजाननला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.

आरोपी मेघनाथला रात्री उशीरा अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत किरकोळ वादातून आरोपीने मेघनाथने भाच्याचा भोसकून खून केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.