‘एकाच विद्याशाखेत नैपुण्य मिळवण्याच्या सक्तीऐवजी विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांमध्ये विभागलेल्या विषयांचे शिक्षण एकाचवेळी घेण्याची मुभा मिळाली पाहिजे,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘लिबरल आर्ट्स आणि विज्ञान शिक्षणाचे भविष्य’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोप सत्रात थरूर यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या संचालिका अनिता पाटणकर आदी उपस्थित होते.
या वेळी थरूर म्हणाले, ‘‘चांगले नागरिक घडण्यासाठी लिबरल आर्ट्स विषयांचे शिक्षण महत्त्वाचे आहे. ही विद्याशाखा विचार करायला, निष्कर्ष काढायला शिकवते. आपल्या तत्त्वांनुसार व्यक्त होण्याचे आणि कृती करण्याचे संस्कारही या शिक्षणातून होतात. इतर विद्याशाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लिबरल आर्टसचे शिक्षण दिले गेले पाहिजे. वैज्ञानिक संशोधन आणि लिबरल आर्टसची तत्त्वे यांची सांगड घातली गेली पाहिजे.’’ या परिषदेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे सेक्रेटरी जनरल फुरकान कामर यांच्या हस्ते झाले. ‘देशातील लाखो विद्यार्थी अद्यापही उच्च शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि गुणवत्तावाढीसाठी निश्चित धोरण आखणे गरजेचे आहे,’ असे मत कामर यांनी व्यक्त केले.