पुणे : ‘नास्तिकता हा विवेकी विचारांकडे जाण्याचा प्रवास आहे,’ असे मत सृजनशील दिग्दर्शक योगेश गायकवाड यांनी रविवारी व्यक्त केले. मात्र, ‘ज्यांना सर्वाधिक गरज आहे अशा वंचित समाजाने नास्तिकतेच्या दिशेने जाण्यासाठीचे प्रयत्न करायला हवेत. नास्तिकांमध्ये जातीची उतरंड निर्माण होता कामा नये,’ अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.

भगतसिंग विचारमंचच्या वतीने आयोजित महाराष्ट्र नास्तिक मेळाव्यात ‘शुभंकरोति-बौद्धवंदना ते नास्तिक’ या विषयावर योगेश गायकवाड बोलत होते. ज्येष्ठ लेखक डाॅ. शरद अभ्यंकर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. दर्शना कुंटे यांनी संपादित केलेल्या ‘भारतीय नास्तिक’ या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. ‘आम्ही संवादी’ संस्थेच्या वतीने ‘भगतसिंग… वन्स मोअर’ हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. मंचाच्या अश्विनी डोके-सातव या वेळी उपस्थित होत्या.

गायकवाड म्हणाले, ‘सुरुवातीला कंटाळ्यातून आणि नंतर वाचन-अभ्यासातून विचारांती नास्तिक झालो. माझ्या घरामध्ये हिंदू देव, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे होती. आईने सांगितले म्हणून शुभंकरोति, मनाचे श्लोक, रामरक्षा, बुद्धवंदना म्हणायचो. हे खेळाच्या आड येते म्हणून मला कंटाळा येत असे. हे नास्तिकतेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे, हे त्या वेळी कळले नाही.’

‘जन्माला आल्यानंतर कागदोपत्री लागला आहे त्या धर्माची गरज आहे का, या विचारातून मी नास्तिक झालो. कोणतेही बंधन नसताना चांगले वागणे, कोणाला मदत करण्याची कृती मानवतेच्या भूमिकेतून होत असेल, तर धर्म हवा कशाला,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘माणूस जन्माला येतो तेव्हा तो नास्तिकच असतो. त्याच्यावर अस्तिकवादाचे संस्कार केले जातात. देव ही वेळ, श्रम, पैसे आणि बुद्धी वाया घालवणारी संकल्पना आहे. सद्गुणांची पूजा म्हणून मूर्तिपूजा केली जाते. पण, आता मूर्तिपूजेचा अतिरेक होत आहे,’ असे डॉ. अभ्यंकर म्हणाले.