प्रवेश देणाऱ्या दलालांपुढे शिक्षण विभागाची शरणागती
प्रवेश प्रक्रिया करून देणारे दलाल, संघटना यांच्यापुढे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शरणागती पत्करली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अकरावीचे रहिलेले प्रवेश आणि दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने बुधवारी घेतला. त्यामुळे आतापर्यंत राबवलेली प्रवेश प्रक्रिया निर्थक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जूनपासून पुणे आणि पिंपरी, चिंचवडमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया गाजते आहे. न्यायालयाने वारंवार खडसावल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया शेवटपर्यंत ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने करण्याच्या गर्जना शिक्षण विभागाकडून करण्यात येत होत्या. मात्र, त्या घोषणाच नाही, तर गेले दोन महिने राबवलेली प्रवेश प्रक्रियाच निर्थक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील राहिलेले प्रवेश, महाविद्यालय बदलून हवे असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि त्याचबरोबर दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश यापुढे महाविद्यालयाच्या स्तरावर करण्याचा निर्णय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवेश करून देणारे दलाल आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रवेश महाविद्यालयाच्या स्तरावर व्हावेत अशी मागणी करण्यात येत होती. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे दलाल आनंदले आहेत. सहाव्या फेरीत प्रवेश फेरी ही नावापुरतीच ‘ऑनलाईन’ राहिल्यामुळे सध्या कोणत्या महाविद्यालयात नेमक्या किती जागा रिक्त आहेत. कोणत्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द झाले आहेत याची नेमकी आकडेवारी शिक्षण विभागाकडे नाही. महाविद्यालयांनी अद्यापही रिक्त जागांचे तपशील कळवलेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर केलेले प्रवेश हे गुणवत्तेनुसारच आहेत का, याची खातरजमा शिक्षण विभाग कसा करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वशिला लावून हवे ते महाविद्यालय मिळवण्याचा पालकांचा आणि पैसे घेऊन ते मिळवून देण्याचा दलालांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा