सुमारे पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. किमान २५ वर्षे सफाई कामगार म्हणून काम करत आहेत अशा सेवकांना कोणत्या सदनिका द्यायच्या याची सोडत बुधवारी (१० एप्रिल) होणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या सरचिटणीस मुक्ता मनोहर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र शासनाने २२ ऑक्टोबर २००८ रोजी किमान २५ वर्षे सफाई कामगार म्हणून काम करून निवृत्त झालेल्या आणि सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवकांच्या वारसांना शहरी गरिबांसाठी असलेल्या राखीव घरांच्या योजनेतून मोफत घरे देण्याबाबतचे परिपत्रक काढले होते. पण सेवकांच्या याद्या तयार होऊन त्यांना घरे मिळण्यासाठी २०१३ उजाडावे लागले. २००८ नंतर निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने’ अंतर्गत हडपसर आणि वारजे भागातील दोन इमारतींमध्ये घरे देण्यात येणार आहेत. या घरांच्या देखभालीचा खर्च महानगरपालिका करणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले. निवृत्त झालेल्या १८८ जणांना सुरुवातीला घरांचे वाटप करण्यात येणार आहे. कोणते घर कोणाला मिळणार याची सोडत महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, महापालिका आयुक्त महेश पाठक आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.