आळंदीच्या नवीन पुलाचा लोखंडी कठडा तोडून इंद्रायणी नदीत पडलेली तवेरा मोटार सकाळी साडेदहाच्या सुमारास सापडली. ही मोटार पुलाच्या खालीच अडकली होती. या मोटारीत दोघे जण असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून अग्निशामक दल, एनडीआरएफ, पोलीस यंत्रणा या मोटारीचा शोध घेत होत्या.
पुण्याकडून आळंदीकडे निघालेली मोटार मंगळवारी दुपारी आळंदीच्या नवीन पुलावरचा कठडा तोडून दोन्ही पुलाच्या मधून इंद्रयाणी नदीत पडली होती. या ठिकाणी मासे पकडण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी ही मोटार पडताना पाहिले. तसेच वाहून जात असलेल्या दोन व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना शक्य न झाल्याने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मंगळवार दुपार पासून एनडीआरएफ व अग्निशामक दलाच्या जवानांनी बोट, गळाच्या साहाय्याने मोटार शोधण्याचा प्रयत्न केला. इंद्रायणी नदीतील पाणी वाढल्यामुळे मोटर शोधण्यात अडचणी येत होत्या. शुक्रवारी मोटारीचा शोध घेताना मोटार पुलाच्या खालीच अडकल्याचे दिसून आले. क्रेनच्या मदतीने मोटार बाहेर काढल्यावर ती तवेरा असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  बी. एम. देशमुख यांनी सांगितले की,  मोटारीच्या क्रमांकावरून माहिती काढली असता यामध्ये संदीप जोगदंड (वय २२, रा. काळेवाडी) आणि सचिन संजीवन लहाणे (वय २५, रा. बीड) हे दोघे जण भाडे घेण्यासाठी निघाले होते. दोघेही नातेवाईक असून भाडे घेतल्यानंतर बीडला जाणार होते असे समोर आले आहे. मोटार पाण्यात पडल्यानंतर दोघे जण वाहून गेले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरूच आहे.

Story img Loader