बेपत्ता असलेल्या भावाचा शोध घेण्यासाठी त्या दोन बहिणींना छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावे, असे पत्र मिळाले. हे प्रदर्शन होते बेवारस मृतदेहांच्या छायाचित्रांचे. एका वर्षांपूर्वी हरवलेल्या भावाचा शोध घेण्यासाठी त्या दोघी शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आल्या. मृत व्यक्तींचे फोटो पाहात असताना त्यांना भावाचा फोटो दिसला आणि त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. महिन्यापूर्वीच झालेल्या वडिलांच्या मृत्यूतून सावरत असतानाच भावाचा मृत्यू समजल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
पोलीस महासंचालकांच्या सूचनेवरून पुणे, सातारा, नगर जिल्ह्य़ातील मृत झालेल्या व्यक्तींच्या फोटोंचे प्रदर्शन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात भरविण्यात आले आहे. घरातील व्यक्ती हरवलेल्या नातेवाईकांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पोलिसांकडून विनंती करण्यात आली होती. या प्रदर्शनात चार अनोळखी मयत व्यक्तींची ओळख पटविण्यात यश आले आहे. दीपक कालिदास झेंडे (वय ३५, रा. गुरुवार पेठ), सतीश मोतीलाल परदेशी (वय ४०, रा. गणेश पेठ), शिवाजी दगडू पवार (वय ६०, रा. वारजे माळवाडी) आणि गणपत शंकर कांबळे (वय ८१) अशी ओळख पटलेल्यांची नावे आहेत. या प्रदर्शनात पुण्यातील १५५, पुणे ग्रामीणमधील ११०, अहमदनगर १० आणि सातारा ८० अकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो ठेवण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत ही छायाचित्रं पाहता येतील.

Story img Loader