संतोष मानेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर नातेवाइकांनी व तपास अधिकाऱ्यांनी मृतांना व जखमींना न्याय मिळाला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या निकालामुळे समाजात चांगला संदेश गेला आहे, अशाही प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या.
माने याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार असल्यामुळे सकाळपासूनच न्यायालयात गर्दी होती. पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला होता. मानेला शिक्षा सुनावताना न्यायालय तुडूंब भरले होते. मानेला निकाल वाचून दाखविण्यासाठी न्यायालयीन कठडय़ात उभे केल्यानंतर सर्वाच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरील भाव शिक्षा सुनावल्यानंतरही काहीच बदलले नाहीत.
उज्ज्वला पवार (जिल्हा सरकारी वकील)-
‘‘माझ्या अर्थाने खरा न्याय झाला आहे. आज झालेले निकालपत्र हे चांगले असून अशा निकालांची गरज आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा समाजात संदेश दिला आहे. बचाव पक्षाने माने वेडा असल्याचा बचाव केला होता. त्यांनी सादर केलेला पुरावा खोटा असून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. हा खटला दुर्मीळातील दुर्मीळ असल्याचे मान्य करत फाशीची शिक्षा सुनावली. रात्रपाळी बदलून दिली नाही म्हणून त्याचा राग सामान्य माणसांवर काढला आहे. हा अक्षम्य अपराध आहे. त्याला पकडल्यानंतर १२ वाजून पाच मिनिटांनी माने त्याच्या फोनवरून बार्शी येथील एका मित्राशी दोन ते अडीच मिनिटे बोलला होता. डॉक्टरांनीही तो वेडा नसल्याचे अहवाल दिले होते. त्याला प्रश्न विचारले असता त्याला सर्व समजत होते. या निकालातून समाजात चांगला संदेश गेला आहे.’’
नंदिनी गायकवाड (घटनेतील मृताची पत्नी)-
‘‘न्यायालयाच्या निर्णयाने पूर्णपणे समाधानी आहे. मीच काय, या घटनेत मृत झालेल्यांचे सर्व कुटुंबीय समाधानी असतील. हे कृत्य अमानूष होते. डोळ्यासमोर आजही ती घटना येत होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी या शिक्षेतून एक संदेश जाईल. आमचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. माझ्या मुलांच्या डोक्यावरचा बापाचा हात काढून घेतला आहे. मानेला झालेल्या शिक्षेची लवकर अंमलबजावणी व्हावी.’’
भाऊराव पाटील (घटनेतील मृत मुलीचे वडील)-
‘‘या निकालाने खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. न्यायालयाने चांगले मुद्दे मांडले आहेत. या घटनेत मी व मुलगी पूजा पाटील सापडलो होतो, त्यात दुर्दैवाने पूजाचा मृत्यू झाला, मी वाचलो. आजही तो दिवस मला आठवतो. मानेला फाशी दिल्याने मी संतुष्ट आहे.’’
राजेंद्रसिंह मोहिते (तपास अधिकारी व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त)-
‘‘या निकालामुळे जखमी व मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला आहे. हा गुन्हा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडला होता. त्यामुळे तपास करताना वानवडी, स्वारगेट, लष्कर, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगली मदत केली. जिल्हा सरकारी वकिलांनी चांगल्या पद्धतीने खटला लढविला. या सर्वाचे हे यश आहे. घटना घडल्यानंतर शहरात गोंधळ निर्माण झाला होता. वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. या खटल्याची व्याप्ती मोठी होती.’’
अॅड. धनंजय माने (संतोष माने याचे वकील)-
‘‘सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. या खटल्यात डॉ. दिलीप बुरूटे यांच्याबाबत काढलेले निष्कर्ष चुकीचे असून याबाबत उच्च न्यायालय काय निर्णय देईल ते पाहू.’’