जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन महिन्यांपूर्वी एटीएमची कॅश व्हॅन लुटून ४३ लाखांची रोकड पळविणाऱ्या आरोपींपैकी दोन फरारी आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यातील एक जण सराईत गुन्हेहार आहे.
गणेश डोंगरे ऊर्फ गणेश मारुती काठेवाडे (वय २९, रा. चाकण), हृषीकेश ऊर्फ हुक्का श्रीकांत गाडे (वय २०, रा. आस्था इमारत, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ते नऊ आरोपींनी एटीएम कॅश व्हॅनवर दरोडा टाकला होता. या गुन्ह्य़ामध्ये ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी सहा आरोपींना अटक केली होती. मात्र, दोघेजण तीन महिन्यांपासून फरार होते.
फरार आरोपींबाबत खंडणी विरोधी पथकाचे हवालदार पांडुरंग वांजळे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाने या आरोपींना धनकवडी व आंबेगाव भागातून शुक्रवारी अटक केली. आरोपींपैकी गणेश डोंगरे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफास लुटल्याबाबत गुन्हा दाखल होता. या दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
एटीएमची कॅश व्हॅन लुटणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक
एटीएमची कॅश व्हॅन लुटून ४३ लाखांची रोकड पळविणाऱ्या आरोपींपैकी दोन फरारी आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
First published on: 30-08-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atm cash van robber arrested