‘एटीएम’मधून पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात पैसे हातात मिळाले नसताना खात्यातून संबंधित रक्कम कमी होण्याचे प्रकार होत असतात. अशा स्वरूपाची ग्राहकाची तक्रार आल्यास ती सात दिवसांच्या आत सोडविण्याचे रिझव्र्ह बँकेचे निर्देश आहेत. तसे न झाल्यास आठव्या दिवसांपासून संबंधित ग्राहकाला बँकेकडून दररोज शंभर रुपये दंड द्यावा लागतो. मात्र, बहुतांश बँकांकडून हा नियमच ग्राहकांना माहिती करून दिला जात नाही. बँकांच्या या लपवा-छपवीमुळे अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
बँकांकडून केल्या जाणाऱ्या या लपवा-छपवीबाबत ‘सजग नागरी मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी रिझव्र्ह बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. एटीएम यंत्रातील काही दोषांमुळे पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्षात पैसे मिळत नाहीत. पैसे काढल्याची पावती मात्र मिळते. त्याचप्रमाणे बँकेच्या खात्यातून संबंधित रक्कम वजाही झालेली असते. अशा वेळी तक्रार कशी करावी व याबाबत कोणते नियम आहेत, याची माहिती बहुतांश ग्राहकांना नसते. असा प्रकार झाल्यानंतर पाळावयाच्या नियमांबाबत रिझव्र्ह बँकेने २०११ मध्येच बँकांना निर्देश दिले आहेत.
रिझव्र्ह बँकेच्या निर्देशांनुसार संबंधित ग्राहकाची ही तक्रार सात दिवसांच्या आत सोडविली गेली पाहिजे. त्यानंतर बँकेला दररोज शंभर रुपये दंड ग्राहकांना द्यावा लागतो. त्याबरोबरच हा नियम प्रत्येक ग्राहकाला कळविण्याबरोबरच प्रत्येक एटीएम केंद्रावर स्पष्ट शब्दांमध्ये हे नियम लावण्यात यावेत, असेही रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. तक्रार कोठे व कशी करावी व नियम काय आहेत, याची माहिती बँकांना ग्राहकांना कळविलेली नाही. त्याचप्रमाणे जवळजवळ सर्वच एटीएम केंद्रांमध्ये अशा प्रकारचे कोणतेही नियम लावलेले दिसत नाही.
याबाबत विवेक वेलणकर म्हणाले, की ग्राहकांना नियम माहीत नसल्याने त्यांची फसगत होते. पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पैसे हातात न मिळाल्यानंतर ग्राहक बँकेत जातो. त्याची तक्रार घेतली गेल्यास ती सोडविण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. नियम माहीत नसल्याने त्याला कोणता दंडही मिळत नाही. त्यामुळे हे नियम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांना सक्ती करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
‘एटीएम’बाबत ग्राहक तक्रारीच्या नियमाची बँकांकडून लपवा-छपवी
‘एटीएम’मधून पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात पैसे हातात मिळाले नसताना खात्यातून संबंधित रक्कम कमी होण्याचे प्रकार होत असतात.
First published on: 15-02-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atm complaint pain bank fine