पुणे : एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करून ग्राहकांकडील पैसे चोरणाऱ्या चोरट्याला सुरक्षारक्षक आणि वाहतूक पोलिसांनी पकडले. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष ब्रिजेश कुमार (वय २४, रा.प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेला साथीदार पसार झाला आहे. याबाबत राजेश शहा (वय ५३, रा. सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शहा व्यावसायिक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते दुपारी केळकर रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम केंद्रात गेले. तेव्हा एटीएममधून पैसे बाहेर पडण्याचा आवाज आला. मात्र, पैसे निघाले नाहीत. काही वेळानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा संदेश आला.

हेही वाचा – पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील

शहा यांनी या घटनेची माहिती मुलीला दिली. त्यानंतर ते बँकेत गेले. एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करुन पैसे काढण्यात आल्याचा संदेश बँकेला मिळाला होता. तेव्हा बँकेने एटीएममधील सुरक्षारक्षकाला याबाबतची माहिती दिली. एटीएमधून रोकड चोरून पसार झालेल्या संतोष कुमार याला सुरक्षारक्षकाने पाहिले. त्याने चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वाहतूक पोलीस आणि सुरक्षारक्षकाने संतोषकुमारला पाठलाग करुन पकडले. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करत आहेत.

हेही वाचा – लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार

एटीएमध्ये तांत्रिक छेडछाड कशी करतात ?

एटीएममध्ये छेडछाड करणारे चोरटे पैसे बाहेर पडणाऱ्या कप्प्यात छोटी धातूची पट्टी चिकटवितात. पैसे कप्यात अडकून बसतात. पैसे काढणाऱ्या ग्राहकाला हे दिसत नाही. ग्राहक एटीएमधून बाहेर पडतात. चोरटे धातूची पट्टी काढून घेतात. कप्यात आलेले पैसे काढून चोरटे पसार होतात. एटीएमध्ये छेडछाड करुन पैसे चोरण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढताना खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एटीएमच्या परिसरात संशयित आढळल्यास त्वरीत याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atm money theft thief caught pune print news rbk 25 ssb