पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या बंधूवर जातीवाचक शब्द वापरल्या प्रकरणी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर शेळके असं आमदारांच्या बंधूचं नाव असून माँटी दाभाडे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण सिद्धार्थ ओव्हाळ यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा… प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रवीण ओव्हाळ हे किशोर आवारे यांना भेटण्यासाठी तळेगाव पोलीस ठाण्यात जात होते. तिथं गर्दी असल्याने ते पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर थांबले. दरम्यान, आमदार बंधू सुधाकर शेळके आणि माँटी दाभाडे त्या ठिकाणाहून जात होते. तेव्हा त्यांनी ओव्हाळ यांच्याकडे बघून जातीवाचक शब्द वापरले. तसंच तू इथून घरी जा, तुझ्याकडे बघतोच अशी धमकीही दिली असं ओव्हाळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान ओव्हाळ यांनी त्याच दिवशी गुन्हा दाखल होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आमदार बंधूंच्या गाड्या तिथं असल्याने घाबरून त्याच दिवशी तक्रार दिली नाही. तेव्हा याबाबत काल गुरुवारी तक्रार नोंदवण्यात आली आहे, सदर घटना ही गेल्या शनिवार घडली आहे. आता घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.