पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत परशुराम बाळकृष्ण वाडेकर (वय ५३, रा. कुंदन हेरिटेज, मुंबई-पुणे रस्ता, खडकी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा (रा. मार्बल प्लाझा, विमाननगर ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
डॉ. लुथरा आणि त्यांची पत्नी डॉ. सुरभी यांच्यात वाद झाला होता. डॉ. लुथरा त्रास देत असल्याने डाॅ. सुरभी यांनी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांची भेट घेतली. पतीच्या त्रासापासून सुटका करा, असा अर्ज त्यांनी वाडेकर यांना दिला होता. वाडेकर यांना तक्रार अर्ज दिल्यानंतर डॉ. लुथरा चिडले. २२ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहाच्या आवारात डॉ. लुथरा यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे वाडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.