पुणे : काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कौस्तुभ गनबोटे यांचे काका प्रभाकर हेदेखील कुटुंबीयांसमवेत काश्मीर सहलीसाठी गेले होते. मात्र, कौस्तुभ काश्मीरला आल्याची कल्पना त्यांना नव्हती. या हल्ल्यात गनबोटे जखमी झाल्याचे वृत्तवाहिन्यांवर दाखवित असल्याचा दूरध्वनी प्रभाकर यांना एका परिचिताकडून आला. त्यनंतर कौस्तुभ तेथे असल्याचे त्यांना समजले. प्रभाकर यांनी मंगळवारी दुपारी पहलगाम सोडल्यानंतर दहशतवादी हल्ला झाला.

‘सर्वांच्या आग्रहामुळे कौस्तुभ प्रथमच काश्मीरला’

‘कौस्तुभने कायम आपल्या फरसाणच्या व्यवसायाला वाहून घेतले होते. या व्यवसायात त्याने चांगला जम बसवला होता. त्यात त्याने अनेक प्रयोग केले. फरसाण तळून झाल्यानंतर त्यातील तेलाचे प्रमाण कमीत कमी व्हावे, यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. त्यात त्याला यशही मिळाले होते. व्यवसाय स्थिरस्थावर झाल्याने ते सर्वांच्या आग्रहामुळे प्रथमच सहलीसाठी काश्मीरला गेले होते,’ असे प्रभाकर यांनी सांगितले.