पिंपरी येथील महेशनगर येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या नववीतील विद्यार्थ्यांवर किरकोळ कारणावरून ब्लेडने वार केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जखमी विद्यार्थ्यांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या मोठय़ा भावासोबत झालेल्या भांडणामुळे या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
अजय चौगुले (वय १५, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. या प्रकरणी अमिन शेख (वय १९) आणि फय्याज शेख (वय २१, रा. नेहरुनगर, पिंपरी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा पिंपरी येथील प्रथमेश इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. त्याच्या मोठय़ा भावाची अमिन आणि फय्याज बरोबर भांडणे झाले होती. त्यामुळे हे दोघे जण अजय याला त्रास देत होते. शुक्रवारी दुपारी ही त्यांनी अजयला खिडकीतून शिवीगाळ केली होती. बाहेर आल्यानंतर बघून घेतो म्हणून सांगितले. शाळा सुटल्यावर गेटजवळ अजय आणि त्या दोघांमध्ये भांडणे झाली. या भांडणात दोघांनी अजयवर लाकडाला बांधलेल्या ब्लेडने वार केले. अजयच्या नाकावर आणि छातीवर वार झाले असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांनी सांगितले, की शिट्टी वाजविल्यामुळे हा वाद झाला. दोघांनी बांबूच्या लाकडाला लावलेल्या ब्लेडने विद्यार्थ्यांवर वार केले आहेत. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.