इंदापूरजवळील लाखेवाडी येथे शेतजमिनीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून २० ते २५ जणांच्या जमावाने दलित कुटुंबाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत दोन महिलांसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बावडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असताना तीन हल्लेखोरांनी या कुटुंबाचे स्वयंपाकाचे घर पेटवून दिले. या घटनेमुळे लाखेवाडीमध्ये दहशत पसरली असून, या गावासह तालुक्यातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी इंदापूर येथे पुणे-सोलापूर रस्ता अडवण्यात आला. या प्रकारातील आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
इंदापूर ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखेवाडी येथील रस्त्याच्या जुन्या वादाच्या कारणावरून तेथील भिंगारदिवे कुटुंबावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब दलित आहे हे माहीत असतानाही जमाव जमवून लाकडी दांडके, लोखंडी गज, पाईप, हॉकीस्टिक वापरून हल्ला करण्यात आला. या वेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली. या कुटुंबाच्या सदस्यांना घराबाहेर काढूनही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर जखमींना बावडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी हल्लोखोरांपैकी तिघे तिथे आले. त्यांनी भिंगारदिवे कुटुंबीयांचे स्वयंपाकाचे घरही पेटवून दिले.
या प्रकरणी दीपक विलास भिंगारदिवे (रा. लाखेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून राजेंद्र बाळकृष्ण शिंगाडे, संजय बाळकृष्ण शिंगाडे, किरण दीपक खुरंगे, महादेव पांडुरंग खुरंगे, विलास पांडुरंग खुरंगे यांच्यासह इतर १५ ते २० अनोळखी लोकांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच, इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात दीपक भिंगारदिवे, समाधान कांबळे, पुष्पा भिंगारदिवे, विलास भिंगारदिवे, जया कांबळे, रघुनाथ भिंगारदिवे, प्रदीप भिंगारदिवे (सर्व रा. लाखेवाडी) हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी लाखेवाडीसह इंदापूर शहर व तालुक्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे तपास करीत आहेत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा