पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागकडून येरवडा परिसरातील हॉटेलबाहेरील बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना जमावाने केलेल्या दगडफेकीत अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जमावाने पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याही वाहनाची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अतिक्रमण विभागाकडून येरवडा भागातील अतिक्रमणांवर मंगळवारी सकाळी कारवाई सुरू होती. यावेळी हॉटेलबाहेरील बेकायदा शेडवर कारवाई सुरू असताना तिथे जमलेल्या जमावाकडून पथकावर दगडफेक करण्यात येऊ लागली. याच दगडफेकीत दगड लागल्याने माधव जगताप जखमी झाले. यानंतर तातडीने त्यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकऱणी जमावाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Story img Loader