शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला केल्या प्रकरणी शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी देण्यात आले.
या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, चंदन साळुंके यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या पोलिसांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली.
सामंत यांच्या मोटारीवर ज्या वेळी हल्ला करण्यात आला. तेव्हा तेथे अटक करण्यात आलेले आरोपी उपस्थित नव्हते. आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती आरोपींचे वकील ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विजय ठोंबरे यांनी युक्तिवादात केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असून पुढील आठवड्यात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.