पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर तिघांनी शस्त्राने वार केल्याची घटना धनकवडीतील चव्हाणनगर परिसरात घडली. तरुणावर हल्ला करुन तिघे जण पसार झाले असून हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.शिवशंकर थोरात (वय २७, रा. धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. थोरात याने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थोरात रात्री सव्वानऊच्या सुमारास चव्हाणनगरमधील निर्मल पार्क इमारतीत असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला होता. एटीएम केंद्रातून पैसे काढून थोरात बाहेर पडला. त्या वेळी तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. थोरात याच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा संशय असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.