पुणे : वैमनस्यातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश बाळू वायकर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नागेश बिलनार (वय २०, रा. थिटे वस्ती, खराडी), मंगेश आंबोरे (वय २३), सचिन अवसरमल (वय २३), अभिषेक गायकवाड (वय २३), राजकुमार गायकवाड (वय १८) यांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. चिरंतन सतीश वाघमारे (वय २५, रा. खांदवेगनर, लोहगाव) याने याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायकर आणि वाघमारे यांची आरोपींशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. ५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वायकर आणि वाघमारे वाघोली परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना गाठले. शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वायकर आरोपींच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी पळाला. आरोपींनी पाठलाग करुन त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड तपास करत आहेत. शहरात वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे वाढीस लागले आहेत. बिबवेवाडीत वैमनस्यातून जामिनावर सुटलेल्या गुंडावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.

Story img Loader