पुण्यातील हडपसर भागात राहणार्या ३६ वर्षीय महिलेवर एका मांत्रिकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दिव्यांग मुलाला बरं करतो, तुमच्याकडे खूप पैसा येईल अशा प्रकारचे आमिष दाखवत आरोपीनं विकृत कृत्य केलं आहे. या प्रकरणी आरोपी मांत्रिकासह एका महिलेविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न अशा कलमाअंतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय गोहाड ऊर्फ नाना असं अटक करण्यात आलेल्या आरोपी मांत्रिकाचं नाव आहे. तर आरोपी महिला सुरेखा जमदाडे हीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिलेचा मुलगा दिव्यांग आहे. तो इतर मुलाप्रमाणे असावा, यासाठी त्याच्यावर उपचार सुरू होते. तर दुसरीकडे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थितीही ठीक नव्हती. आर्थिक परिस्थिती सुधरावी यासाठी पीडित महिलेचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान, आरोपी महिला सुरेखा जमदाडे हिच्यासोबत पीडित महिलेची ओळख झाली. पीडित महिलेची अडचण लक्षात आल्यानंतर आरोपी महिला जमदाडे यांनी पीडितेला आरोपी मांत्रिक धनंजय गोहाड ऊर्फ नाना यांच्याकडे आणलं. तुमचा मुलगा लवकर बरा होईल, तुमच्या पतीकडे खूप पैसे येतील, पण यासाठी दर मंगळवारी मुलाला कडू लिंबाच्या पाल्याने आंघोळ घालत जावा, अकरा सोमवार दूध भात एकत्रित शिजवून त्याचे लेपन पिंडीला करायचे, प्रत्येक पोर्णिमेला मुलावरुन लिंबू उतरून टाकायचे आणि काळी बाहुली दरवाजाला बांधायची, तर शनिवारी दही, भात, उडदाची काळी डाळ, गुलाल हे मुलावरुन उतरून टाकण्यास सांगितले. मांत्रिक धनंजय गोहाड ऊर्फ नाना याने सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय वेळोवेळी केले. पण तरीही मुलामध्ये आणि घरच्या परिस्थितीत काही फरक पडला नाही.
तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढावी लागेल. ते सर्व विधी तुमच्या घरी येऊन करावे लागतील, असं आरोपी मांत्रिक धनंजय गोहाड यानं पीडित महिलेला सांगितलं. त्यानुसार आरोपी मांत्रिक आणि आरोपी महिला दोघंही पीडित महिलेच्या घरी गेले. आरोपींनी पीडितेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्या अंगाला रक्तचंदनामध्ये लिंबू पिळलेला लेप लावला. एवढे सर्व उपाय करून देखील कोणत्याही फरक पडला नाही. त्यामुळे पीडित महिलेने आरोपी मांत्रिक धनंजय गोहाड ऊर्फ नानाकडे विचारणा केली.
याबाबत कोणालाही काही सांगितल्यास, तुझा पती मरेल, दुसरा मुलगा देखील दिव्यांग होईल. तुझा संसार उद्धवस्त होईल आणि भावाचा अपघात होईल, अशी धमकी दिली. आरोपी मांत्रिक एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडितेला घाणेरडे मेसेज आणि व्हिडीओ पाठवले. अखेर पीडित महिलेनं हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मांत्रिक धनंजय गोहाड ऊर्फ नाना यास अटक केली. आरोपी महिला सुरेखा जमदाडे हिचा शोध सुरू असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितलं.