पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कामगार जखमी झाला.
याबाबत सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दांडक्याने मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख एका पेट्रोल पंपावर कामाला आहेत. सोमवारी (१३ जानेवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी निघाले होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर परिसरात तीन चोरट्यांनी त्यंना अडवले. लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. डोक्यात दांडके बसल्याने ते जखमी झाले. झटापटीत चोरट्यांनी शेख यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी प्रसंगावधान राखून पिशवी घट्ट पकडली. त्यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच चोरटे पसार झाले.
हेही वाचा >>>पुणे पोलीस दलाच्या बॉम्बशोधक-नाशक पथकातील ‘तेजा’ला भावपूर्ण निरोप
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.
प्रभात रस्त्यावर मोबाइल चोरीला
प्रभात रस्त्यावर व्यावसायिकाकडील ८० हजार रुपयांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मार्केट यार्ड भागात राहायला आहेत. ते रविवारी रात्री प्रभात रस्ता परिसरात आले होते. रात्री अकराच्या सुमारा प्रभात रस्त्यावरील देहाती हाॅटेलजवळ थांबले होते. मोबाइलवरुन ते ॲप आधारित मोटार सेवेची नोंदणी करत होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजारांचा मोबाइल संच चोरुन नेला. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.
हेही वाचा >>>पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरी
कोरेगाव पार्क भागात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन ने्ल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कोरेगाव पार्क भागात राहायला आहेत. त्या सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातील गल्ली क्रमांक सात परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव तपास करत आहेत.