पुणे : कुलगुरू नियुक्तीसाठीची पात्रता, संस्थेचा कारभार या अनुषंगाने तक्रारी करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांचे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील कुलगुरूपद अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत का, असा प्रश्न पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चिला जात आहे. यानिमित्ताने कुलगुरूपदासाठी अटींचा फेरविचार व्हावा, असेही मत व्यक्त होत आहे. हा संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत डॉ. रानडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

डॉ. अजित रानडे यांची कुलगुरूपदी २०२२मध्ये नियुक्ती झाली. संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा असताना डॉ. रानडे यांच्याकडे कुलगुरू पदासाठी आवश्यक पात्रता नाही, माहिती दडविली, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य सरकारला चुकीची माहिती दिली, अनावश्यक पदांची निर्मिती करून आर्थिक गैरव्यवस्थापन झाले, अशा प्रकारच्या तक्रारी ‘यूजीसी’कडे करण्यात आल्या. संस्थेचे तत्कालीन कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी बजावलेल्या नोटिशीला डॉ. रानडे यांनी उत्तरही दिले आहे. याबाबत डॉ. रानडे म्हणाले, ‘सर्व आरोप निराधार आहेत. माझी नियुक्ती नियमानुसार पारदर्शक पद्धतीने झाली. आरोपांबाबत सक्षम वैधानिक प्राधिकाऱ्यांना आवश्यक ते स्पष्टीकरण देण्यात आले आहे.’

हेही वाचा >>>मुंबईसह किनारपट्टीवर चार दिवस कोसळधारा

डॉ. रानडे यांना दहा वर्षे अध्यापनाचा अनुभव नाही, असा मुद्दाही उपस्थित केला गेला होता. याबाबत ‘यूजीसी’चे माजी उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, ‘या अटीचा फेरविचार करण्याची गरज आहे. प्राध्यापकांना कुलगुरू करण्याचा हट्ट असू नये. कुलगुरू पदाच्या जबाबदाऱ्या आता बदलल्या आहेत. कुलगुरूंकडे शैक्षणिक जबाबदाऱ्यांच्या पलीकडे नेतृत्त्व, भविष्याचा दृष्टिकोन, निधी उभारणी अशा अनेक जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा संरक्षण क्षेत्रातील अनुभवी लोकही कुलगुरू पदासाठी मिळू शकतात. प्राध्यापक निवडीमध्ये दहा वर्षे अध्यापनासह संशोधनाचा अनुभव ग्राह्य धरला जातो. तशीच मुभा कुलगुरू निवडीतही दिली पाहिजे. असा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आणि यूजीसीच्या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस योजनेला अनुरूप आहे.’

पुण्याच्या प्रथितयश गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्याबाबत यूजीसीकडे विविध तक्रारी झाल्या आहेत. त्यांची खुर्ची डळमळीत करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

या संदर्भात केले गेलेले सर्व आरोप निराधार असून, मी ते फेटाळतो. माझी नियुक्ती नियमानुसार अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली.- डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था

कुलगुरू पदावरील निवडीसाठी प्राध्यापक म्हणून दहा वर्षांच्या अध्यापनाची अट असली, तरी पात्रता तपासणे ही संबंधित प्राधिकरणाची जबाबदारी आहे. त्याच्याशी उमेदवाराचा संबंध नाही. – डॉ. भूषण पटवर्धन, माजी उपाध्यक्ष, यूजीसी